"मला भावलेले भाऊराव"
डॉ. निलेश पवार,
न्यू कॉलेज, कोल्हापूर.
दहावी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेज मध्ये प्रवेश घेण्याच भाग्य लाभलं आणि हळू हळू भाऊराव मनाला भावु लागले, 19 व्या शतकात ठराविक वर्ग आणि शहरा साठी मर्यादित असलेल्या शिक्षणाची गंगा वर्गविरहित वाडी वस्ती पर्यंत घेऊन जाण्याचे महान काम या आधुनिक शिक्षणाच्या भगिरथाने केले. अश्या या भगिरथाचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा खोऱ्यातील कुंभोज या गावी झाला. भाऊरावांचा बाणा हा लहानपणापासूनच वारणेच्या वाघा सारखा असायचा, कसलाही मुलाहिजा न बाळगता मनाला पटेल आणि योग्य वाटेल ते करणे, आपले परखड विचार कशाचीही पर्वा न करता मांडणे हे भाऊरावाचें जन्मजात गुण.
भाऊराव कोल्हापूर ला शिक्षणासाठी असताना जैन बोर्डिंग मध्ये राहत, तिथल्या कर्मठ रूढींना विरोध करणे तसेच सोहळ न घालून रुढींना फाटा देणे , राजर्षी शाहू नी अस्पृश्यासाठी सुरु केलेल्या मिस क्लार्क हॉस्टेल च्या उदघाटनासाठी जाऊन परत आल्यावर अंघोळ न करता जेवायला येणे, या सर्वांचा परिपाक म्हणून शेवटी भाऊरावना हॉस्टेल सोडावे लागले.
Thinking out of box असणाऱ्या भाऊरावना पुढे काय करायचे हा प्रश्न पडला, जवळच्या नातेवाईकांच्या ओळखीने पुढील शिक्षणासाठी भाऊराव हे शाहू महाराजांच्या वाड्यावर दाखल झाले आणि आपले उर्वरित शिक्षण पूर्ण करू लागले, पण सामाजिक असंतोलाची चीड, थोडासा स्वभावात असणारा बंडखोरपणा या मूळ भाऊरावांचे शिक्षणात दुर्लक्ष होई आणि अश्यातूनच भाऊराव इंग्रजी विषयात नापास झाले, आता भाऊरावच्या शिक्षणाचा शेवट होणार हे लक्षात आल्यावर घरच्यांनी महाराजां करवी कुलकर्णी मास्तरांना बोलवले, आणि चक्क महाराजांनी मास्तरांना विनंती केली की भाऊरावना पुढच्या वर्गात ढकला, त्यावेळी कुलकर्णी मास्तरांनी असं काही उत्तर दिलं की भाऊरावांचे शिक्षण तिथंच सम्पले, कुलकर्णी मास्तर म्हणाले, एकवेळ भाऊराव ज्या बेंच वर बसतात तो बेंच पुढच्या वर्गात ढकलेंन पण या भाऊराव ला कदापि नाही. नियतीला भाऊरावांनी पदवी प्राप्त करणं बहुतेक मान्य नव्हतं, पण स्वतः जवळ कसलीही पदवी नसणारा माणूस रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या शाखेद्वारा 2019 पर्यंत सुमारे 1 कोटी विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन पदवीधारक बनवतो, ही गोस्ट खरंच असामान्य आणि जागतिक स्तरावर नोंद घेण्यासारखी आहे.
भाऊरावांनी लाखो पदवीधारक तयार करण्यासाठी 1919 ला काले तालुका कराड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली नंतर 1924 ला सातारा येथे स्थलांतर केले. अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला हा लावलेला हा वटवृक्ष हळूहळू नभाकडे वाटचाल करू लागला, काम करण्याची निरपेक्ष वृत्ती आणि लोकांच्या भक्कम पाठिंम्ब्याच्या जोरावर संस्थेने आपले जाळे संपूर्ण पश्चिम महाराष्टात पसरले, खेडोपाडी रयत च्या शाळा उभ्या राहू लागल्या, साताऱ्यात शाहूंच्या नावे सर्व जातिधर्मातील मुलांसाठी वसतिगृह उभे राहिले.
भाऊरावांच्या जीवनात काही कटू प्रसंग सुद्धा आले ज्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापुरातील डांबर प्रकरणाचा समावेश होतो, त्यावेळी अण्णांच्या मनात नकळत आत्महत्येसारखा विचार सुद्धा येऊन गेलेला. अश्या बाका प्रसंगातून सावरून अण्णांनी आपली उद्दिष्ट्य पूर्ती चालू ठेवली, ग्रामीण भागातील बऱ्याच मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवलं, पी जी पाटील सारख्या मुलाला मुंबई विद्यापीठाचा राजाभाई टॉवर सर करण्याची प्रेरणा दिली, गुणवत्तेला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन केलेल्या महाविद्यालयाच्या पहिल्या प्राचार्य पदी केरळ वरून माणूस आणला.
भाऊरावांच्या जीवनावर थोडा डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता पण त्यांनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेण्याचे टाळले, महात्मा गांधी हत्येनंतर तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि भाऊराव यांच्या वादाची परिणीती म्हणून महाराष्ट्र शासनाने रयत चे अनुदान थांबवले, आणि जवळ जवळ 3 ये 4 वर्ष अण्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला, शेवटी जन मता समोर सरकार झुकले आणि परत अनुदान चालू झाले, गांधी हत्येनंतर गांधींच्या प्रेमापोटी भाऊरावांनी गांधींच्या नावाने 100 शाळा उभ्या करायचा संकल्प सोडला तो नंतर संस्थेने पूर्ण केला.
रयत चा हा वटवृक्ष खरंच नभाला मोह पाडू लागला, याचा उल्लेख रयत गीतांमध्ये सुरुवातीलाच होतो, ' रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे! '.
जगामध्ये बहुतांश लोकांचा जन्म हा स्वतःच जीवन समृद्ध करण्यासाठी होतो, किंबहुना ते तसा प्रयत्न करतात, पण भाऊरावासारखी माणसं वैयक्तिक आयुष्याला महत्व न देता संस्था म्हणून आपलं आयुष्य जगतात आणि आपलं संपूर्ण जीवन संस्थेसाठी अर्पण करतात आणि शेवटी अजरामर होतात.
अश्या ह्या मला भावलेल्या भाऊरावांना अभिवादन करताना शेवटी एवढंच म्हणेन 'झाले बहु होतील बहु परंतु या सम हा'.
अश्या या अनाम वीरास जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏🙏🙏🙏

Comments

Post a Comment