"दूर दूरच दूरदर्शन, कस झालं हातचं काकन"
डॉ. निलेश पवार, न्यू कॉलेज, कोल्हापूर
सह्याद्रीच्या कुशीमधील कार्तिक स्वामी रांगेतील बाळोबाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेलं आमचं गाव, आमचा जन्म आणि गावात धोम धरणाचं पाणी 1980 च्या दरम्यान आलेलं. गाव सधन, पण करमणुकीसाठी कायमस्वरूपी रेडिओ सोडलं तर काय पण नाय. गावात पहिला tv म्हणजेच आपलं दूरदर्शन आलं ते 1985 च्या दरम्यान, तिथं पण पैसे देऊन बघायला गर्दी. रामायण बघायला तर उभं राहून बघावं लागायचं, कोणतरी मोठं माणूस मध्येच सगळ माहीत असल्याचा आव आणायचं जस काय रामायण लिहीत असताना ह्यो वाल्मिकींच्या शेजारी बसलेला. आम्हाला कायम एकच कौतुक, राम लक्ष्मण अंघोळ आणि बाकीचं विधी कधी करत्यात, बरीच जण राम दिसला की पाया पडायची, रामायण चालू असताना मध्येच लाईट गेली की मग काय प्रत्येक वेळी आमच्या शब्दकोशात भरती होईल असल्या शिव्या, टीव्हीत झिरमुळ्या आल्या की सगळ्यांच्या नजरा अँटेना वर कावळा बसलाय का बघायला. एखादा राष्ट्रीय नेता गेला की चारपाच दिवस टीव्ही बंद, नुसतं इंद्रधनुष्य टीव्ही त घुसल्या सारखे कलर बँड आणि कुर्र्रर्रर्र आवाज. Sorry for interruption सारखं वाचून आमच्या इंग्रजीत 3 शब्दांची भर पडलेली.
2 ते 4 वर्षान गावात कलर tv आला मग लोकांचा मोर्चा तिकडं वळला, आम्हाला हळू हळू बरच कळायला लागलेलं आता रामायण संपून महाभारत सुरु झालेलं, शंख फुकुन यदा यदा हि धर्मस्य म्हंटल की समजायचं महाभारत सुरु झालं, हळू हळू जाहिराती पाठ होऊ लागल्या, वॉशिंन्ग पावडर म्हणजे निरमा हे एवढं मनावर बिंबल की, इकडं ती निरमा गर्ल म्हातारी झाल्यावर बाकीच्या पावडर माहीत झाल्या, टीव्ही बघताना मध्येच प्यार हुआ एकरार हुआ जाहिरात लागली की सगळे कावरे बावरे व्हायचे, त्यावेळी टीव्ही वर एकच चॅनेल दिसायचं, देश की भावनाओंका दर्पण दूरदर्शन. लोकांचं सगळ्यात ना आवडते काय असेल तर बातम्या, फक्त सुरु होतानाच त्याच music आवडायचं, आमच्या गावशेजारच एक बँड ते music आहे तस वाजवायच. सिनेमा आठवड्यातून एकदा त्यो पण रात्रीचा म्हणजे बारक्या पोरांनी बघायचाच नाय, फक्त सकाळी कुणाकडून तरी स्टोरी ऐकायची, कोणतरी रानात भांगालताना हमखास स्टोरी सांगायचं, बाकी छायागीत, चित्रहार, रंगोली लागल की हौशी tv वाले आवाज वाढवायचे, भारत एक खोज, कंट्री वाईड क्लासरुम, सुरभी मूळ ज्ञानात भर पडायची, ब्योमक्येश बक्षी, एक शून्य शून्य चोर पोलीस सारखं वाटायचं, तो क्रॉवन चा टीव्ही कपाट उघडल्या सारखा बंद आणि चालू करावा लागायचा, दामिनी सारख्या सिरीयल एवढी वर्ष चालल्या की त्या सिरीयल मधील कलाकार खरोखरच म्हातारे झाले, आमच्या खोंडाचा बैल होऊन मेला तरी त्या चालूच. C I D सारखी सिरीयल बघण्याने टीव्ही बंद असला तरी टीव्ही कडे बघितले की शिवाजी साटम दिसायचा , त्या दरम्यानच सेट मॅक्स च नाव सूर्यवंशम झालं.
हळू हळू चॅनेल वाढले, रिमोट आला, केबल सुरु झाली, सर्वच बदलत गेलं. तहकिकात आणि गोट्या सारख्या सिरीयल ची जागा राणादा आणि शनया ने कधी घेतली समजलं पण नाही.
आमचा टीव्ही बदलला, सहजा सहजी न उचलणाऱ्या टीव्ही एका हातात उचलणाऱ्या झाल्या, टीव्ही ची size हि कमी होऊ लागली, size कमी होण्याचा वेग एवढा होता की तो हातात बसू लागला, हल्ली सर्वांच्या मोबाईल मध्ये टीव्ही दिसू लागला, इंटरनेट च्या 4G स्पीड ने आम्ही कुठपन कधीपन कायपण चॅनेल पाहू लागलो, खरच दूर दुरचं दूरदर्शन कधी हातचं काकन झालं कळलंच नाही, जॉन लॉगी बेअर्ड नी 1926 ला लावलेला टीव्ही चा शोध जवळ जवळ 100 वर्ष माणसाच्या करमणुकीचे साधन बनला, धन्य ते लॉगी बेअर्ड आणि धन्य ते दूरदर्शन म्हणजेच आजचे हातचे काकन🙏🙏👏👏

Comments