" एक रुपया चांदीचा, सारा देश गांधींचा?"
डॉ. निलेश पवार,
न्यू कॉलेज, कोल्हापूर
गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असताना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला ध्वजारोहणाच्या अगोदर प्रभात फेरीत अनेक घोषणापैकी आम्हाला गुरुजींनी सांगितलेली एक घोषणा म्हणजे ' एक रुपया चांदीचा सारा देश गांधींचा'.
खरंच सारा देश गांधींचा होता?वयाची 40 वर्ष पूर्ण होत आली पण अजूनही हे समजलं नाही की खरच सारा देश गांधींचा होता किंवा नाही. पुस्तकातून गांधी आम्हाला शिकायला मिळाले ते म्हणजे आफ्रिकेत ट्रेनमधून खाली टाकलेले सामान, सविनय कायदेभंग, असहकार, सत्य, अहिंसा, दांडी सत्याग्रह, पुणे करार, चले जाव चळवळ या वेगवेगळ्या स्वरूपात, आणि बाहेर त्यांची वेशभूषा, चष्मा, काठी, टक्कल यावरून सर्वात जास्त कुचेस्टा सहन करत असलेला नेता. भारताची फाळणी, पाकिस्तानला 55 कोटींची आर्थिक मदत, फाशी वाचण्यासाठी भगतसिंग ना कसलेही सहकार्य केले नाही, यांच्यामुळं स्वातंत्र मिळायला उशीर अश्या अनेक गोष्टी बापूंच्या बद्दल बाहेरून ऐकायला मिळाल्या. या सर्वांचा परिणाम म्हणजे गांधींजींच्या प्रतिमेबद्दल मनात संभ्रम तयार झाला, जो चिकित्सक वाचनाशिवाय दूर होणारा नव्हता.
हा संभ्रम दूर होण्याची सुरुवात झाली ती म्हणजे 'माझे सत्याचे प्रयोग' या पुस्तकाच्या वाचनाने, गांधीजी समजण्याची दुसरी पायरी म्हणजे आमच्या वनस्पतिशास्त्रात मैलाचा दगड ठरलेल्या ,' Private life of Plant' या Documentary चे निर्माते डेविड अटेनबर्ग यांचे बंधू रिचर्ड अटेनबर्ग यांचा 'गांधी' हा चित्रपट, या चित्रपटाने 8 ऑस्कर पुरस्कार जिंकलेत, हा चित्रपटाने गांधी विचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकटी दिली, या चित्रपटासह इतर वाचनातून हळू हळू गांधी उमगू लागले.
सद्यस्थितीत भारतात अनेक महान व्यक्ती आपापल्या जातीत किंवा धर्मात दैवत्व बहाल होण्याच्या मार्गावर आहेत, पण गांधीजी याला अपवाद ठरतात. स्वजातीचा म्हणून त्यांचा कोणी उद्धार करत नाही, स्वधर्माचा म्हणून पण कोण मानत नाही. हिंदू असल्याने मुस्लिम त्यांना आपला नेता मानणे शक्य नव्हते, कट्टर हिंदूंना नेहमी ते मुस्लिम धार्जिणे वाटत, डावे त्यांच्या अहिंसावादाच्या विरोधात, सर्वात जास्त टीका,टिपणी आणि विनोद होणार व्यक्तिमत्व तरी पण गुरुजी 'एक रुपया चांदीचा सारा देश गांधींचा' ही घोषणा द्यायला का सांगत असावेत हा प्रश्न सारखा पडत असत.
आत्तापर्यंत वाचलेल्या संदर्भातून लक्षात येते ते म्हणजे ज्या विचारसरणीचा पाया हा जात आणि धर्मावर वसलेला आहे त्यांना म्हणजेच मूलतत्ववाद्यांना गांधीजीं 100% स्वीकारणे कदापि शक्य नाही, मग गांधींचे अनुयायी कोण? गांधींच्या मागे सर्व समाजातील स्वातंत्र्याच्या प्रेरणेने प्रेरित झालेले कोट्यवधी सैनिक होते, म्हणून बापूंना एका माणसाचे सैन्य म्हणत. भारतातील कामगार, शेतकरी, सुशिक्षित वर्ग, नोकरदार सर्वजण देशप्रेमापोटी गांधीजींच्या मागे ठाम पणे उभे राहत. गांधीजी अहिंसावादी असले तरी त्यांचे सर्व अनुयायी अहिंसावादी होते असे नाही, बापूंचे सर्वात जवळचे अनुयायी सरदार पटेल अहिंसावादी नव्हते, अगदी आपल्याकडे शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे आणि गांधींच्या नावे 100 शाळा बांधण्याचा संकल्प करणारे कर्मवीर असतील किंवा प्रतिसरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील असतील, असे असंख्य भारतीय बापूंचे नेतृत्व मानत पण टोकाची अहिंसावादी विचारसरणी कधीच मानत नसत, मला सुद्धा सुरुवातीचे सनातनी गांधी, टोकाचा अहिंसावाद, शरीरसुख फक्त प्रजननासाठी असावे, असे गांधींचे विचार मान्य नाहीत.
गांधीजी पूर्णपणे टाळणे कुणालाही शक्य नाहीत, मग ते डावे असोत किंवा उजवे, गांधीजींच्या जन्मशताब्दीला अगदी गोळवलकर गुरुजी सुद्धा गांधीजी बद्दल गौरवोउदगार काढतात, " गांधीजींनी भारतीयांमध्ये स्वातंत्र्या बद्दलची प्रबळ प्रेरणा निर्माण केली". गांधीजींच्या गोवंशहत्या सारख्या विषयांचे समर्थन करतात.
स्वदेशी, सत्य, अहिंसा, देशप्रेम या सारख्या तत्त्वांनी गांधीजी कोट्यवधी भारतीयांना आपले वाटत. उक्ती आणि कृती मध्ये नसलेला फारसा फरक यामुळं हे नेतृत्व जात, भाषा, प्रांत ओलांडून अखंड भारतात आपलेसे झाले, चले जाव आंदोलनात गांधीजींच्या एका हाकेवर कोट्यवधी लोक रस्त्यावर उतरले आणि याची प्रचिती आली. चले जाव सारख्या अनेक आंदोलनांची फलप्राप्ती म्हणजे स्वातंत्र. इतर अनेक नेत्यांनी स्वातंत्र लढ्यात सहभाग घेतला, बलिदान दिलं, पण गांधीजींच्या मागे असलेल्या कोट्यवधी भारतीयांनी गांधीजींना एक असामान्य नेतृत्व बनवलं, जे नेतृत्व स्वातंत्र मिळालं त्यावेळी बंगाल मध्ये हिंदू मुस्लिम दंगली मिटवत होतं.
गांधीजींच्या विचारांची छाप फक्त भारतात नव्हती तर ती जगभर होती, अमेरिकेत मार्टिन लुथेर नी आपली सर्व यशस्वी आंदोलने गांधीमार्गाने केली.' Father of Africa' नेल्सन मंडेला यांनी आयुष्यभर गांधी मार्गाने स्वातंत्रलढा दिला, नुकतेच आफ्रिकेच्या राजदूतांनी म्हंटले आहे, मंडेला आमचे Father of Africa असतील तर गांधी हे Grandfather आहेत. बराक ओबामा ना एका स्कूल मध्ये भाषणात एका मुलाने विचारले, तुम्हाला हयात असलेल्या किंवा नसलेल्या कोणत्या व्यक्तीबरोबर डिनर करायला आवडेल, क्षणाचा पण विलंब न करता ओबामांनी गांधीजींचे नाव घेतले. Time मॅगझीन ने Man of Century म्हणून निवडलेले अल्बर्ट आईनस्टाईन गांधीजी बद्दल म्हणतात " असा नंगा फकीर पृथ्वीवर होऊन गेला यावर येणाऱ्या पिढीचा विश्वास बसणार नाही". Apple चे सर्वेसर्वा स्टिव्ह जॉब्स गांधींच्या तत्वज्ञानानी भारावून जातात, आणि आपल्या चष्म्याची फ्रेम बापूंच्या चष्म्यासारखी ठेवतात. UNO ने सुद्धा बापूंच्या जागतिक शांततेतील योगदानाबद्दल 2 ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक अहिंसा दिन' म्हणून घोषित केला आहे.
असे नानाविध प्रसंग असतील किंवा उपाध्या असतील ज्यामुळं गांधीजी देशापुरते मर्यादित न राहता सातासमुद्रापार जातात. सारा देश गांधींचा असो अथवा नसो मात्र जो पर्यंत हा देश आहे तो पर्यंत गांधी असणार, मानवाच्या शेवटच्या अस्तित्वापर्यंत गांधीविचार जिवंत राहणार यात तिळमात्र शंका नाही.
शेवटी जाता जाता आचार्य नरहर कुरुंदकरांनी आपल्या शिवरात्र मध्ये लिहलेला एक किस्सा share करतो आणि थांबतो.
गांधीजी आणि गुरुदेव टागोर सूर्योदयाच्या वेळी शांतिनिकेतन मध्ये फिरत होते, पूर्वेला लाल रंग पसरले होते. पाखरे आनंदाने किलबिलत होती. कवी म्हणाले, " गांधीजी, या सौन्दर्याला, या आनंदाला तुमच्या तत्वज्ञानात काही जागा आहे काय?" गांधीजींनी उत्तर दिले, " निश्चितच जागा आहे, सूर्योदयाचे रमणीय रंग पाहून पाखरांची गाणी गावीत यासाठीच तर माझे तत्वज्ञान आहे. मात्र तुम्ही सूर्योदयाच्या वेळी गाणारी पाखरे पाहता अन मी सूर्योदयाच्या वेळी पाखरांना गाण्याची इच्छा व्हावी म्हणून सायंकाळी ती पोटभर जेवून झोपलेली असावीत याचीही काळजी घेतो."
अश्या या पाखरांची काळजी घेणाऱ्या महात्म्यास 150 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏🙏🙏

Comments